रिजर्व बँक भरपूर नोटा का छापत नाही?

           व्हेनेझुएला' जगात तेलनिर्मिती मध्ये सर्वात अग्रेसर असा हा देश आज भिकेला लागला आहे. या दिवाळखोरीमागे अनेक कारणे आहेत आणि जास्तीत जास्त चलनी नोटा छापून बाजारात उतरवणं त्यातील एक प्रमुख कारण. जास्तीत जास्त नोटा छापून जनतेत वितरित केल्या आणि त्यांना खर्च करायला सांगितलं तर अर्थव्यवस्था जोमात येईल असा विचार राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी केला पण झालं उलटंच. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पार कोमात जाऊन मृत्युशय्येवर पोहोचली आहे. असं नोटा छापून अर्थव्यवस्था रुळावर येत नाही तर चलन फुगवटा होऊन उरली सुरली अर्थव्यवस्था डबघाईला जाते. 

              झिम्बाब्वे, सोमालिया हे देश सुद्धा अशाच प्रकारे चलन फुगवट्यामुळे बरबाद झाले.

हे चित्र सोमालिया मधील आहे. या ट्रॉलीमधील नोटांच्या ५-६ गड्ड्या देऊन हा माणूस जास्तीत जास्त एक पाण्याची बाटली खरेदी करू शकतो. इतक्या प्रमाणात या नोटांचे अवमूल्यन झाले होते.

झिम्बाब्वे या देशात नोटा छपाईचा जो धडाका सुरु झाला त्यामुळे तिथे २३ कोटी १० लाख टक्क्यांनी चलनाचे अवमूल्यन झाले होते. म्हणजे नोटा छपाईपूर्वी १ झिम्बाब्वे डॉलरला मिळणारे चॉकलेट बेधुंद नोटा छपाईमुळे २३ कोटी १० लाख झिम्बाब्वे डॉलरला मिळू लागले. ही महागाई नव्हती तर चलन फुगवटा होता. चलन फुगवट्यामुळे झिम्बाब्वे सरकारला १०० ट्रिलियन (१००,०००,०००,०००,०००) डॉलरची नोट छापावी लागली.

रिझर्व्ह बँकेने जास्तीत जास्त नोटा छपाई केल्यास काय होईल?

यासाठी एक काल्पनिक उदाहरण देऊन समजवायचा प्रयत्न करतो.

समजा अरबी समुद्रात एक बेट सापडले आणि या बेटावर एक हजार लोकांनी वसाहत करून नवीन देश स्थापन केला. या वसाहतीला आपण भारत-२ म्हणूया.

भारत-२ मध्ये सगळ्या गोष्टी फुकट आहेत पण फोन मात्र विकत घ्यावा लागतो. एक हजार फोन साठी भारत-२ च्या रिझर्व्ह बँकेने ५० लाख मूल्य असलेल्या चलनाचा पुरवठा केला. तर एक फोन पाच हजाराला पडेल.

भारत-२ च्या रिझर्व्ह बँकेने जर १ कोटी मूल्य असलेल्या चलनाचा पुरवठा केला आणि फोनची निर्मिती १००० नग एवढीच असेल तर प्रत्येक फोनमागे पाच हजारांची वाढ होऊन एका नगाची किंमत दहा हजार होईल. ५० कोटी मूल्याच्या नोटांचा पुरवठा केल्यास प्रत्येक फोनची किंमत पाच लाखांवर जाऊन पोहोचेल. अशाप्रकारे नोटा छापल्याने फक्त चलनाचे अवमूल्यन होऊन फुगवटा वाढत जातो.

रिझर्व्ह बँकेने सरसकट नोटा छापायचा धडाका लावल्यास काय होईल?

  • सर्वसामान्य जनतेकडे असलेल्या नगदी चलनांची किंमत कमी होईल.
  • सगळ्याच गोष्टींच्या किंमतीत वाढ होईल. त्यामुळे जास्तीत जास्त चलनी नोटा बाळगाव्या लागतील.
  • या नोटा फक्त शोभेच्या वस्तू बनून राहतील.
  • देशाला बाहेरून कर्ज मिळणे अवघड होईल.
  • अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल.

त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी नोटा छपाई हा पर्याय नाही. याचे फायदे नगण्य आणि तोटे अनेक आहेत.


Comments

Popular posts from this blog

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?

मराठी युवक व्यवसाय करायला का घाबरतात?