वाघ समोर आल्यावर काय करावे?

 

               तुमचा सामना समोरासमोर वाघाशी झालाच तर तुमच्याकडे स्वत:च्या बचावासाठी बरेच काही करण्यासारखे असते. सामान्यपणे वाघ आपल्यापेक्षा लहान दिसणार्‍या जिवांवरच हल्ला करतो. त्यामुळे वाघ समोर आल्यास चुकूनही खाली बसू नका! वाघ समोर आल्यास मनुष्य घाबरून पळू लागतो. आणि वाघाची इच्छा नसतानाही त्याच्यातील शिकारी वृत्ती जागी होऊन तो तुमच्यावर झडप घालू शकतो. तुम्ही कितीही वेगाने पळ काढला तरी काही क्षणातच तो तुम्हाला गाठू शकतो. विशेष म्हणजे कुठलाही वाघ आपल्या शिकारीवर पाठीमागूनच हल्ला करतो. त्यामुळे वाघाशी सामना झाल्यावर पाठ दाखवून पळणे म्हणजे स्वत:ला मृत्यूच्या दारी झोकून देण्यासारखेच असते. जंगलात फिरताना मुखवट्याचा वापर करणे खूपच हिताचे ठरते. मुखवट्यामुळे वाघ संभ्रमात पडतो आणि तो कितीही भुकेला असला तरी दोन चेहरे पाहून वाघ तुमच्यावर हल्ला करण्याचे टाळतो. वाघ अगदी पुढ्यात येऊन ठेपल्यास दोन्ही हात लांब सोडा आणि ताठ मानेने उभे राहा. यामुळे वाघाला तुम्ही खूप बलवान असल्याची जाणीव होईल. अशावेळी वाघांच्या हालचाली ध्यानात घ्या. वाघ सारखा आपले शेपूट जमिनीवर घासत असेल तर तो तुमच्यावर हल्ला करण्यासाठी अगदी तयार असल्याचे समजावे. 

        तुम्ही एखाद्या जंगलात फिरत असताना वाघ तुम्हाला दिसत नसला तरी वाघाने तुम्हाला पाहिलेले असते. आणि तो किमान अर्धा किलोमीटर अंतरावरून तुमचा अंदाज घेत तुम्ही जात असलेल्या दिशेनेच माग काढत लपतछपत तुमच्या हालचाली टिपत असतो. तुमच्या पुढे आलेला वाघ हा वयस्क आहेत की वयात आलेला छावा, हे तुम्हाला सहजासहजी ओळखता येणार नाही. त्यामुळे जोराने ओरडल्यास कमी वयाचा वाघ पळून जाण्यात धन्यता मानतो. एखादी वाघीण आपल्या पिलांसह फिरत असताना चुकूनही तिच्या जवळ जाऊ नका. पिलांना धोका असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाल्यास ती तुमच्यावर हल्ला करू शकते. वाघांची घ्राणेंद्रिये खूपच तीक्ष्ण असतात. त्यामुळे जंगलातून वाघाचा अधिवास असलेल्या स्थळापासून जाताना वारा वाहत असलेल्या विरुद्ध दिशेने चालणे सोयीस्कर ठरते. तुम्ही रात्री दुचाकी वाहनाने जंगलातील रस्त्यावरून जात असताना वाघ समोर आल्यास वाहनाचे लाईट बंद केल्यास वाघ आपल्या मार्गाने निघून जातो. परंतु, वाहन बंद करू नये. 

स्रोत :गुगल 

Comments

Popular posts from this blog

रिजर्व बँक भरपूर नोटा का छापत नाही?

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?

मराठी युवक व्यवसाय करायला का घाबरतात?